पुस्तक

मी पुस्तकं वाचतांना
आयुष्य अनेक जगलो
मी आयुष्य जगतांना
पुस्तकांसारखा वागलो

त्यांनी जशी लिहून घेतली
पाठीवर अनेक सुखे दुःखे
तशीच मी गिरवीत राहिलो
मनामनातील अक्षरे

का कुणी म्हणावे मजला
मित्र म्हणून कुणीच नाही
पुस्तकांतून भेटले मज
मैत्री हुन अधिक काही

पुस्तकांतून दिसल्या कथा घराघरातील
पानापानांतून उठल्या कधी किंकाळ्या
तर कधी प्रेम विरहाच्या कहाण्या
आज ही ऐकू येतात त्या डरकाळ्या

मित्र असा कोण असे या जगतात
पुस्तकांसारखा मित्र कुणी नसे
जखमेवर मीठ चोळण्यास तत्पर सारे
पुस्तकचं विचारी दुःख होरपळणारे

मी आयुष्य वाचतांना
पुस्तकी कधी न जगलो
मी आयुष्य जगतांना
पुस्तकांसारखा वागलो

✍श्रीकांत गोविंदराव पाटील,धुळे

Comments

Popular posts from this blog