साकव
नमस्कार लोकहो,सज्जनहो....मी बोलतोय....मी कोण....मी तोच ज्याच्या पाठीवरून आणि पोटावरून तुम्ही अलिकडून पलीकडे जात होतात. मी कितींदा तरी कुरकुर केली तरी माझ्याकडे कानाडोळा करून तुम्ही तुमच्याच विश्वातील घाई गर्दीत पळत होतात. एकदा किमान एकदा तरी तुमच्या पळापळीतील एका क्षणासाठी माझी अवस्था ऐकून घेतली असती ना तर काल परवा घडलेला प्रसंग टाळता आला असता.
आज मीच नाही पडलोय तर तुमच्यातील हो तुम्हांसगळ्यातील एक "दुवा" साधणारा पूल पडलाय. तुम्हांपैकी प्रत्येकाच्या कानी माझ्या करूण अवस्थेतील आरोळ्या पोहचल्या होत्या पण तुमच्या इतका स्वार्थी प्राणी माझ्यातरी पाहण्यात नाही.
मला निर्माण करणारा, त्या निर्मिती करण्यासाठी कुणा बिल्डर ला काम देणारा आणि माझ्या निर्मिती कार्यातून पैशारूपी मलई खाणाऱ्या बऱ्याच जणांचे चेहरे आजही मला आठवतात आणि त्यांना मी स्वार्थी,अप्पलपोटी या वर्गात बसवतो. त्यांच्या सोबत तुम्हांस ही. हो....का.....का तुम्हांपैकी कुणी माझ्या अवस्थेकडे लक्ष केंद्रित केले नाही.
माझी निर्मिती तुमच्या काळात झाली ह्या गोष्टींलाच मी माझे दुर्भाग्य समजतो. जर मी त्या दूरदृष्टी असलेल्या राजांच्या काळात बांधलो गेलो असतो ना लोकहो...तर मी शप्पतेवर सांगतो अजून पुढील कित्येक वर्षानुवर्षे ताठ मानेने तुम्हांसकट तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना मी माझ्या पाठीवरून या तिरावरून त्या तीरावर पोहचवू शकलो असतो. पण दुर्दैव... माझं निर्माण करणाऱ्यांकडे महाराजांसारखी दृष्टी नव्हती. जर ती असती तर जसे त्या काळी निर्माण झालेले माझे बांधव पूल, किल्ले अन गड आज दिमाखात उभे आहेत ना त्याच दिमाखात मी ही उभा राहिलो असतो. किमान तुमच्यावर राज्य करून गेलेल्या त्या साहेब लोकांचा आदर्श माझ्या निर्माण कार्यात तुमच्या डोळ्या समोर ठेवला असता तरी हा प्रसंग न ओढवता.
असो वाईट एकाच गोष्टी करिता वाटतयं की, ज्या कसाब ने तुमच्या आणि माझ्याही ओळखीच्या जनतेवर बेशुट गोळीबार करून मरणास भाग पाडले त्यालाही मी माझ्या पाठीवर वाहून रुग्णालयाच्या इमारती पर्यत पोहचवले तेव्हा का मी पडलो नाही. आज पर्यंत कुटुंबातील सदस्यांच्या पोटापाण्याकरिता ज्यांनी माझ्या वरून प्रवास केला त्यांच्यावर व माझ्याच रूपातील रुग्ण आणि वैद्य यांच्यातील जी दुवा होती "पूल" होती तिच्या पिलांच्याच अंगावर कोसळून कसा माझा आणि दुदैवाने त्यांचाही जीव गेला.😢
✍ श्रीकांत गोविंदराव घरटे पाटील
Comments
Post a Comment